Advertisement

Responsive Advertisement

सर्व बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा करावा- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

 औरंगाबाद : शेतकऱ्यांना खरिप पिकांसाठी वेळेत कर्ज पुरवठा करुन शासनाच्या विविध लाभाच्या योजनेचे प्रस्तावाला मान्यता देऊन कर्ज पुरवठा करावा, अशा सूचना जिल्हा अग्रणी बँक समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या.
 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांच्यासह सर्व बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. महेश डांगे, क्षेत्र नियोजन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, भारतीय रिझर्व बँकेचे सुरेश पटवेलकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक इम्रान खान, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, एचडीएफसी, पंजाब नॅशनल बॅंक, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, युको बँक यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
 औरंगाबाद जिल्हा खरीप हंगामातील कृषी उत्पन्नावर आधारित असणारा जिल्हा असल्याने शेतकऱ्यांना खरीप पीकासाठी लागणाऱ्या कर्जप्रकरणे बँकांनी प्राधान्याने मंजूर करावीत. तसेच कृषी अधारित जोड व्यावसाय आणि कौशल्य विकासाच्या उद्योग व योजनासाठी त्वरीत लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी कर्ज प्रस्तावातील त्रूटीची पूर्तता कालबद्ध पद्धतीने पूर्ण करुन कर्ज पुरवठा करावा, याचबरोबर रिझर्व बँकेच्या सूचनेप्रमाणे 5 हजार लोकासंख्येच्या प्रमाणात बँकांनी नवीन शाखा सुरु करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या आढावा बैठकीत सर्व बँक प्रतिनिधी यांना दिल्या.
 जिल्हा अग्रणी बँकेचे  व्यवस्थापक मंगेश केदार यांनी जिल्ह्यात शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विभागाच्या योजना यासाठी दिला जाणारा कर्ज पुरवठा, लक्षांकपूर्ती याबाबतचा आढावा समिती समोर सादर केला. यामध्ये संपूर्ण वित्तीय समायोजन, अटल पेन्शन योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जपूरवठा, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ, इतर मागास प्रवर्ग महामंडळ, महिला आर्थिक महामंडळ यांच्यासह कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, आत्मा या विभागातील विविध लाभाच्या योजनाच्या प्रकरणातील कर्ज देण्याबाबतचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता त्रूटीची पूर्तता करुन स्वीकृत करावेत, असे यावेळी सांगितले.
 औरंगाबाद जिल्हयातील महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याचा शासन निर्णयाची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी सर्व बँक शाखा प्रमुखांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेडे यांनी या बैठकीत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या