Advertisement

Responsive Advertisement

प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे गैरसोयींचे आगार... अर्थात माणगाव बस आगार.... ?

      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या माणगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माणगाव बस आगार तथा स्थानकाची अवस्था एसटी महामंडळ विभागातील संबंधित व्यवस्थापनाच्या गलथान, कामचलाऊ, अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभारामुळे दिवसेंदिवस अत्यंत बकाल आणि गैरसोयीची होताना दिसून येते आहे. सदर माणगाव बस स्थानकाचे काही वर्षांपूर्वी बस आगारात रुपांतर करण्यात आले आहे. या बस आगारातून संपूर्ण माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच रायगड जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे इत्यादी ठिकाणी प्रवाशांना येजा करण्यासाठी परिवहन व्यवस्था करण्यात येते. 
       राज्य परिवहन महामंडळाने त्यांच्या सर्व एसटी बसेस गाड्यांवर दोन्ही बाजूला मोठ्या अभिमानाने आपल्या अर्धगोलाकार सिंबॉलवर " प्रवाश्यांच्या सेवेसाठी " असे ब्रीदवाक्य लिहिले आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील माणगाव बस स्थानकाच्या आवारात पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण बस स्थानकाला जणू तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्यामुळे माणगाव बस स्थानकाच्या आवारातील चिखल आणि दुर्गंधी युक्त जलमय सद्य स्थिती मुळे प्रवाशांची या बस स्थानकात येजा करताना फार    मोठी कुचंबणा होत आहे. 
      माणगाव बस स्थानकातील अस्वच्छ शौचालय, मुतारी, पिण्याच्या पाण्याची वानवा, प्रवासी प्रतिक्षा दालनातील अस्वच्छता, बस स्थानकातील वेडसर, मनोरुग्णांचा स्वैराचार, गळक्या एसटी बसेस    इत्यादी कारणांमुळे सर्व प्रवासी वर्गात संताप निर्माण झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची सदर परिवहन सेवा ही नक्की प्रवाशांच्या सेवेसाठी आहे...? की गैर सेवेसाठी...? असा प्रश्न तमाम प्रवाशांच्या मनात निर्माण झाला आहे. 
        वाढत्या इंधन दरांच्या महागाई मुळे परिस्थितीनुरूप त्या त्या काळात एसटी महामंडळाने केलेल्या तिकीट दरवाढीचा विरोध न करता केवळ एसटी नेच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवश्यक सुखसुविधा उपलब्ध करून देणे हीं एसटी महामंडळाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु एसटी महामंडळाच्या संबंधित विभागाच्या ढिसाळ, कामचलाऊ कारभारामुळे  दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. 
      माणगाव बस स्थानकातील सदर गैरसोयींच्या विरोधात प्रवासी आणि अनेक सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे तक्रारी आणि त्या संबंधाने आंदोलने करण्यात आली आहेत. तरी सुद्धा सदर परिस्थितीत अपेक्षित बदल होताना दिसत नाही. याचा अर्थ एसटी महामंडळाचा माणगाव बस स्थानक व्यवस्थापन विभाग सहनशील प्रवाशांच्या सहनशीलतेचा अजून किती अंत पाहणार आहे....?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या