Advertisement

Responsive Advertisement

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पुई गाव स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने बनले स्वप्नातील गाव


       बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायत मधील पुई हे छोटेसे गाव, मागील तीन वर्षांपासून गावाचा विकास करण्यासाठी एक स्वप्नातील गाव बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेषतः या गावातील महिलांनी स्वप्नातील गाव बनविण्याची जणू प्रतिज्ञाच केली होती. ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण गावाने त्यांना मदत केली. नारी शक्ती काय असते हे खऱ्या अर्थाने पुई या गावाने दाखवून दिले आणि म्हणूनच सोमवार दि.25 जुलै रोजी सिद्धेश्वर ग्रामपंचायतीतील पुई हे गाव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वप्नातील गाव म्हणून प्रमाणित करण्यात आले.
     या गुणगौरव सोहळ्यासाठी सुधागड तालुक्याचे तहसिलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी यादव, पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.उमेश यादव, ग्रामसेवक श्री.गोरड, स्वदेश फाउंडेशनचे संचालक राहुल कटारिया, उपसंचालक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक शिवदास वायाळ, सहाय्यक व्यवस्थापक समीर शेख, समन्वयक सोनाली पवार व सर्व स्वदेस कर्मचारी आणि इतर परिसरातील गावविकास समितीचे सदस्य उपस्थित होते. 
     पुई हे छोटेसे गाव पालीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे, या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथील तरुण हे पाली बाजारपेठेमध्ये भाजीपाला तर काहीजण गॅरेज तर काही तरुण मंडळी नोकरी तर काही तरुण मंडळी हे रिक्षा व्यवसाय करत असून आपल्या घरातील उत्पन्न वाढीचे काम करीत आहेत. गावात एक शुद्ध लघु पाणीपुरवठा योजना व एक विहीर आहे गावामध्ये एकूण सात पथदिवे आहेत. त्यापैकी तीन पथदिवे हे सोलर वर आहेत. या गावात एक बचतगट आहे व त्याची नोंदणी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे. गावात जवळपास हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या वृद्ध/ज्येष्ठ व्यक्ती सोडल्या तर हे संपूर्ण गाव साक्षर आहे.
     गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, गावकी, पदाधिकारी, गाव विकास समिती, शासन आणि स्वदेस फाउंडेशन सारख्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणादायी वाटचाल करीत असले तरी या सर्व पायाभरणीत गावकऱ्यांचा सहभाग तितकाच मोलाचा आहे. आपल्या स्वप्नातील गाव बनविण्यासाठी गावातील समस्यांचा सखोल अभ्यास करून गावाचा नियोजित गावविकास आराखडा तयार करण्यात आला. आज अखेर नियोजित गावविकास आराखड्याच्या वाटचालीने काम करीत असताना स्वतः गावातील ग्रामस्थ शासन व स्वदेस फाउंडेशन यांच्या सहकार्याने गावातील लोकांनी गावांमध्ये बहुतांश विकास कामे पूर्ण केली आहेत. ही विकासकामे पूर्ण करत असताना ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा तेवढ्यात तत्परतेने गावातील विकास कामांना हातभार लावला आहे. आज या विकास कामांच्या अनुषंगाने व गाव विकास समिती यांच्या प्रयत्नाने संपूर्ण गाव हे हागणदारीमुक्त आहे. तसेच आदर्श गावाकडे वाटचाल करीत असताना गावातील लोकांसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, प्रत्येक कुटुंबाकडे बँक खाते, गरीब व गरजू लोकांना शासकीय निवृत्ती वेतन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पथदिवे, आर्थिक साक्षरतेच्या अनुषंगाने गावातील महिलांनी व लहान मुलांनी केलेली बचतीची सुरुवात, गावातील लोकांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, गावातील लोकांना प्राथमिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, मुलांच्या शिक्षणाप्रती लोकांमध्ये जागरूकता, निसर्गाप्रती आपुलकी जपत असताना दरवर्षी वृक्ष लागवड करणे व वनांचे संरक्षण करणे इत्यादी बाबी जोपासत विविध गोष्टींनी परिपूर्ण असे पुई गाव आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे.
     गावाच्या या प्रवासामध्ये गावातील लोकांची जिद्द व चिकाटी तसेच शासन व स्वदेस फाउंडेशन यांची बहुमोल अशी साथ व मार्गदर्शन मिळत आहे. भविष्यात आपल्या या गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श गावांच्या यादीमध्ये घेतले जाईल, यानुषंगाने गाव विकास समिती व ग्रामस्थ मिळून प्रयत्न करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या