Advertisement

Responsive Advertisement

माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाटवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; संपूर्ण माणगाव तालुका शोकाकुल

     बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) माणगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र तुळशीराम वाटवे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 
      बुधवार दिनांक १९ जुलै रोजी कर्तव्यावर असलेले माणगाव पोलीस उपनिरीक्षक जितु तथा जितेंद्र तुळशीराम वाटवे यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी माणगाव शहरातील मोर्बा रोडवर असलेल्या अल्फा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने २० जुलै रोजी  पहाटे ४-०० वाजता त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५४ वर्ष होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांनी रायगड पोलीस दलात जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कर्तव्य तत्परतेने कर्तव्यनिष्ठ कामगिरी बजावली होती. त्यांच्या आकस्मिक निधनापूर्वी त्यांनी पोलीस खात्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी मुळे त्यांची सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाली होती. ते प्रज्ञा विकास बौद्ध मंडळाचे सभासद होते.  त्यांच्या धक्कादायक आकस्मिक दुःखद निधनाची वार्ता माणगाव मध्ये पसरताच संपूर्ण माणगाव करांना धक्काच बसला, आणि संपूर्ण माणगाव तालुका अक्षरशः शोकाकुल झाला. कारण संपूर्ण माणगाव करांनी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाटवे यांच्या रुपाने खाकी वर्दीतील देव माणूस पाहिला होता आणि अनुभवला होता. त्यामुळे त्यांच्या अशा आकस्मिक दुःखद निधनाने माणगाव करांना शोक अनावर झाला. त्यांच्या अंत्य दर्शनासाठी माणगाव वाकडाई नगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या मित्र परिवार आणि हितचिंतकांनी प्रचंड गर्दी केली होती. 
       त्यांच्या अंत्ययात्रेसाठी माणगाव सह अन्य तालुक्यातील नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर, रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, माणगाव डी वाय एस पी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि त्यांचे आप्तेष्ट तसेच प्रज्ञा विकास मंडळ, बौद्ध समाज  माणगाव व माणगाव तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत पोलीस दला कडून त्यांना अखेरची सशस्त्र मानवंदना देऊन शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर माणगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या