Advertisement

Responsive Advertisement

जेव्हा पहिल्यांदाच कलेक्टर आणि एसपी ट्रॅक्टरने शिंदेवस्तीत येतात, नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

औरंगाबाद, : वैजापूर तालुक्यातील वांजरगावपासून अडीच किलोमीटर अंतरावरील शिंदेवस्तीत पाऊस आणि पुरामुळे रस्ता खराब होतो. या रस्त्याने वांजरगावहून ट्रॅक्टरच्या साहाय्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक  मनीष कलवानिया जाऊन शिंदे वस्तीत ग्रामस्थांची भेट घेतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्या सोडविण्याची ग्वाही देतात. पुरामुळे पाण्याचा वेढा येणाऱ्या या वस्तीत चक्क स्वतः जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक शिंदेवस्तीत येऊन ग्रामस्थांशी संवाद साधतात. त्यामुळे शिंदेवस्तीयांमध्ये आनंदासह समाधान झाल्याचे  ग्रामस्थ म्हणतात.
पिण्याचे पाणी, रस्ता, पूल, वीज, शेती, पशुधन आदींबाबत शिंदेवस्तीतील 80 वर्षीय एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ गागरे, जगन्नाथ शिंदे, बाळू शिंदे, धोंडीराम शिंदे यांच्याशी श्री. चव्हाण यांनी संवाद साधला. गोदावरीला आलेल्या पाण्यामुळे गावाला पाण्याचा वेढा पडतो. तेव्हा गावातील ट्रॅक्टर , पिकअपचा आधार घेऊन गावकऱ्यांना वांजरगाव येथे जावे लागते, असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.  गावात 49 कुटुंबातील 380 लोकसंख्या असून आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी यावेळी सांगितले. शिंदेवस्तीला भेट दिल्यानंतर वैजापूर-गंगापूर पुलाची पाहणीही श्री. चव्हाण यांनी केली.  तसेच सरला बेट येथेही भेट देत रामगिरी महाराज यांच्याशी गोदा पात्रातील येवा आणि पूरस्थितीबाबत चर्चा केली.
पाहणी दरम्यान उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

*नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे*
नाथसागर जलाशयातून 54 टक्क्यांहून अधिक भरला आहे.  नाशिकहून पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पैठण, गंगापूर आणि वैजापुरातील नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे.  प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  चव्हाण यांनी केले.
गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील संकटेश्वर मंदिर येथे मंदिराचे पुजारी अनिरुद्ध गिरी गोसावी, सरपंच नामदेव आघाडे, ग्रामस्थ यांच्याशी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संवाद साधला. जुन्या नेवरगावाचे ग्रामस्थ यांनी पुनर्वसित गावात स्थलांतरित व्हावे. पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल, नेवरगाव-पीरवाडी रस्ता दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामस्थांना श्री. चव्हाण यांनी दिली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी यावर कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. 

*गंगापूर तहसीलमध्ये आढावा*
गंगापूर तहसीलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा आढावा श्री. चव्हाण यांनी घेतला. गंगापूर तालुक्यातील संभाव्य पूरग्रस्त गावे आणि आपत्ती व्यवस्थापनसंबंधी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती उपविभागीय अधिकारी आहेर, तहसीलदार सतीश सोनी यांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना दिली. यावेळी तहसील कार्यलयातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूर नियंत्रण कक्षास भेट देत आवश्यक त्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 
***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या