Advertisement

Responsive Advertisement

काम करताना एकजूटीची भावना महत्वाची : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर       बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) परिवारात काम करताना एकजूटीची भावना महत्वाची असून त्या भावनेतून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेतून कोणतेही काम यशस्वी होते, असे प्रतिपादन रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दि.01 ऑगस्ट 2022 रोजी  केले.
      महसूल दिनाच्या निमित्ताने सोमवार, दि.01 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर बोलत होते.
     यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, सतीश कदम, ज्ञानदेव यादव यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील व महसूल विभागातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर अधिकारी-कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की, महसूल विभागावरील विश्वास स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही कायम आहे. कोणताही विषय तडीस नेण्याची क्षमता महसूल विभागात आहे. आपल्या विभागासाठी लोकभावनेतून, लोकोपयोगी काम करण्याचा आज संकल्प करायला हवा. आपल्या शासकीय कारकिर्दीत जनतेच्या दृष्टीने उत्कृष्ट काम करण्याचे आपले ध्येय ठरवायला हवे. आजचा दिवस महसूल विभागासाठी निश्चितच महत्वाचा असून तो सर्वांनी मिळून साजरा करायलाच हवा, मात्र हा दिवस साजरा करताना आपल्यावर सामाजिक जबाबदारीही तितकीच आहे, ही जाणीव महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने बाळगणे आवश्यक आहे.
     विविध विषयात कोकण विभागात रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर हे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे सामूहिक यश आहे, याबाबत अभिनंदन करून जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर पुढे म्हणाले की, दिलेल्या जबाबदारीला नाही म्हणू नये. कोणतेही काम करण्यास महसूल यंत्रणा समर्थ आहे म्हणूनच आपल्याकडे जबाबदारी येते, याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. आजचा काळ विकासाचा काळ आहे. प्रत्येक नागरिकाला सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यातून मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही. डिजिटायझेशन प्रक्रिया देखील महसुली यंत्रणेमुळे यशस्वी ठरली आहे. येत्या काळात तांत्रिकदृष्ट्या साक्षर होणे, डिजिटायझेशन आत्मसात करणे सर्वांना गरजेचे आहे. कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी त्या कामाशी प्रामाणिक राहून कामांचा क्रम निश्चित करावा. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी सुसंवाद ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे.
     शासकीय कर्तव्य बजावित असताना या स्पर्धात्मक जगात आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्वाचे असल्याचे सांगून प्रत्येकाने एक तरी छंद जोपासावा, कुटुंबाला वेळ द्यावा, आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करावा, शिकायला लाजू नये, अभ्यास करावा, शिकाल तितके मोठे व्हाल, चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा, सकारात्मक विचार करावा, असा मोलाचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.
     जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर पुढे म्हणाले की, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील युवक युवतींसाठी जिल्हा प्रशासनाकडून “गरुडझेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” चालविण्यात येते. भविष्यात या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून कुटुंबातून एक जरी व्यक्ती अधिकारी किंवा कर्मचारी झाला तरी ते आपले यश आहे.
     शेवटी या वर्षभरात सर्वांनी दिलेली साथ मोलाची असून ही दिलेली साथ कायमच माझ्या स्मरणात ठेवीन, आपण सर्व मिळून असेच एकजूटीने, एकदिलाने समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी एकनिष्ठ राहू या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
     या कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारयादी प्रमाणीकरण करण्यासाठी आधार क्रमांकाच्या माहितीबाबतचे पत्र नमुना 6(ब) चे उपस्थितांना वाटप करण्यात आले. तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांनी त्याबाबतच्या कार्यवाहीची माहिती सर्वांना दिली.
     महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या हस्ते उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी म्हणून गौरविण्यात आलेल्या सत्कारमूर्तींची नावे पुढीलप्रमाणे:
     महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड व खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी
     अलिबाग निवासी नायब तहसिलदार अजित टोळकर आणि महाड निवासी नायब तहसिलदार प्रदीप कुडळ
     अव्वल कारकून- जिल्हाधिकारी कार्यालय-पुरवठा शाखा श्रीमती कविता साळवी, खालापूर तहसील कार्यालय नितीन परदेशी, माणगाव तहसील कार्यालय परमेश्वर खरोडे, पोलादपूर तहसील कार्यालय मंगेश ढेबे,
     मंडळ अधिकारी- पेण तहसील कार्यालय (पेण) प्रकाश मोकल, तळा तहसील कार्यालय (मांदाड) संजय ठाकर, पोलादपूर तहसील कार्यालय (कोंढवी) सुरेश राठोड
     महसूल सहाय्यक- जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल शाखा प्रवीण भोईर, उरण तहसील कार्यालय शिवनाथ गिरी, कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालय रोहित बागुल, महाड तहसील कार्यालय श्रीमती वृषाली पवार
     तलाठी- जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचे कार्यालय श्रीकृष्ण पास्ते (विशेष उल्लेखनीय पुरस्कार), मुरुड तहसील कार्यालय (तलाठी सजा मुरुड) रुपेश रेवसकर, तळा तहसील कार्यालय (तलाठी सजा मांदाड) अनिकेत पाटील, श्रीवर्धन तहसील कार्यालय (तलाठी सजा वडवली) मिलिंद पुट्टेवाड,
     वाहन चालक- अलिबाग तहसील कार्यालय सचिन आगरे
     शिपाई/स्वच्छक/रखवालदार- जिल्हाधिकारी कार्यालय विजय गायकवाड, पनवेल तहसील कार्यालय एकनाथ घरत, रोहा तहसील कार्यालय अमोल लोखंडे, म्हसळा तहसील कार्यालय दीपक चव्हाण
     कोतवाल- अलिबाग तहसील कार्यालय (तलाठी सजा वरसोली) अमोल करदेकर, पेण तहसील कार्यालय (तलाठी सजा बोरगाव) श्रीमती धनश्री पाटील, सुधागड तहसील कार्यालय (तलाठी सजा वाघोशी) हरिभाऊ देशमुख,
     पोलीस पाटील- पनवेल तहसील कार्यालय (पळस्पे) कुणाल लोंढे, पोलादपूर तहसील कार्यालय (तलाठी सजा देवळे) श्रीमती विमल मोरे, महाड तहसील कार्यालय (तलाठी सजा कोतेरी) विलास जाधव
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले. तर सूत्रसंचालन तहसिलदार सचिन शेजाळ यांनी केले. शेवटी उपस्थित सर्वांचे अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या