Advertisement

Responsive Advertisement

शिऊर मध्ये काय ते हरिनाम, काय ते अन्नदान, काय ते नियोजन सगळं कसं ओक्के शिऊरमध्ये अवतरली भक्ती पंढरीवैजापूर(शांताराम मगर )

सप्ताह व एकादशीचा संगम , शिऊरला रेकॉर्डब्रेक गर्दी , सप्ताहचा उत्सव शिगेला 
शिऊर: संत पंरपरेतील केंद्रस्थान असलेले श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या २७७ वा अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने शिऊरमध्ये सोमवारी अक्षरशः भक्ती पंढरी अवतरली होती, हजारो भाविकांची उपस्थिती विशेष ठरली. 
श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिष्य परंपरेतील श्री संत शंकरस्वामी महाराज  यांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह २७६ वर्षांपासून अविरत सुरू आहे, सप्ताहाचे हे २७७ वे वर्ष असून संतभूमी असा लौकिक असलेल्या शिऊर येथील श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिर प्रांगणात होत आहे. २ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या सप्ताहाला एकादशीच्या दिवशी हजारो भाविकांची मांदियाळी बघायला मिळाली. एकादशी व सप्ताह निमित्ताने संतभूमी शिऊर मध्ये जणू काही भक्ती पंढरी अवतरली होती. 
*समाधीवर फुलांची आरास* 
सप्ताह व एकादशीच्या निमित्ताने श्री संत शंकरस्वामी  महाराज यांच्या समाधीला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे, सोबतच फुलांचे भव्य तोरण लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान रांगोळीतुन साकारलेले विठ्ठल भाविकांचे आकर्षण ठरले.  
*मोबाईल मध्ये ऐतिहासिक क्षण क्लिक* 
श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान फडाचा २७७ वा फिरता नारळी सप्ताह ऐतिहासिक ठरत आहे, स्वामींच्याच समाधीस्थळी होत असलेल्या या सप्ताहाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे, मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यानंतर हे देखणे मंदिर बघण्यासाठी व सप्ताहला हजेरी लावण्यासाठी सोमवारी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता, दरम्यान हा ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यात साठवल्यानंतर प्रत्येक जण आपल्या मोबाईलच्या कॅमेरात हे क्षणचित्र कैद करत होता. 
*भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने फराळ घेत रांगेत घेतले समाधीचे दर्शन* 
एकादशी निमित्ताने उपस्थित हजारो भाविकांना फराळ वितरण करण्यात आले, सप्ताह समितीच्या सूक्ष्म नियोजनाने शिस्तबद्ध पध्दतीने भाविकांनी प्रसाद घेतला, तर स्वामींच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी दिवसभर रीघ लागली होती. 
*बा, स्वामीराया सगळी कडे आनंदी आनंद राहू दे* 
श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सोमवारी प्रचंड गर्दी होती, यातील प्रत्येक जण  आपल्या श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी येत होता, यंदा शेती बहरू दे, सगळीकडे आनंदी आनंद राहू दे असे साकडे वारकऱ्यांनी स्वामींना घातले. 
सोमवारी सकाळी एकनाथ महाराज सदगीर, दुपारी रामभाऊ महाराज राऊत, तर रात्री रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे कीर्तन झाले. 
*"स्वामीपथ" चे प्रकाशन* 
श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने श्री संत शंकरस्वामी महाराज  यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा "स्वामीपथ" विशेषांक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आला . दरम्यान शांताराम मगर यांनी ड्रोनद्वारे छायाचित्रण करण्यात आले. 
*देवभक्ती, देशभक्तीमध्ये मानवाचे कल्याण : एकनाथ महाराज सदगीर* 
देवभक्तीसोबतच देशभक्ती मध्ये मानवाचे कल्याण असून संत व महापुरुषांच्या विचारांचे आचरण करावे असे मत एकनाथ महाराज सदगीर यांनी कीर्तनात व्यक्त केले. 
*सप्ताहाची आज सांगता* 
२७७ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज दिनांक ९ रोजी सांगता होत आहे, आज सकाळी  संस्थानचे उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे यांचे काल्याचे कीर्तन होऊन भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे. 
सप्ताह यशस्वितेसाठी संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांच्यासह विश्वस्त व सप्ताह समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या