Advertisement

Responsive Advertisement

सोयगांव तालुक्यात मका पिकावर विविध गावात शेतीशाळा उपक्रमातून कृषि विभागामार्फत मार्गदर्शन

सोयगाव/विजय पगारे
------------------------------------
सोयगांव तालुक्यात कृषि विभागाच्या आत्मा योजनेतून खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये मका पिकावर तालुका कृषि अधिकारी एस. बी. पवार, मंडळ कृषि अधिकारी एस. जी. वाघ व जे. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळा राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने फर्दापूर मंडळातील रवळा व वरखेडी खु. आणि बनोटी मंडळातील नायगांव, पळाशी व वाडी या गावांचा समावेश आहे. सदरच्या शेतीशाळांमध्ये मका पिकाच्या लगावडीपासून ते काढणीपर्यंत सहा वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थांवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

रवळा येथे १६ मे २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२, वरखेडी खु येथे १४ मे २०२२ ते ८ ऑक्टोबर २०२२, नायगांव येथे १७ मे २०२२ ते ११ ऑक्टोबर २०२२, वाडी येथे १८ मे २०२२ ते १२ ऑक्टोबर २०२२ तसेच पळाशी येथे १९ मे २०२२ ते १३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अनुक्रमे कृ. स. एम. आर. भोळे, कृ. स. ए. एस. बावस्कर, कृ. स. एस. एस. पाटील, कृ. स. आर. एन. साळुंखे, कृषि पर्यवेक्षक एच. बी. देशमुख व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ए. एस. महाजन यांचे मार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच सदरील शेतीशाळा उपक्रमात प्रगतशील शेतकरी, रिसोर्स बँकेतील शेतकरी व कृषि विज्ञान केंद्र येथील विषय विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन, मका पिकातील नवनवीन प्रयोग व अनुभव सांगण्यात येत आहे. सदरील शेतीशाळा राबविण्यासाठी शेतकरी निवड, बिजप्रक्रिया, बियाणे व खते खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, गट निर्मिती, एकात्मिक किड व खत व्यवस्थापन, माती परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताचे व्यवस्थापन, किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, काढणी पश्च्यात तंत्रज्ञान व शेती पूरक व्यवसाय अश्या विविध अवस्थांची निश्चिती करण्यात आलेली आहे.

जूलै व ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या शेतीशाळा वर्गात प्रामुख्याने अमेरिकन लष्करी अळी जीवनक्रम व व्यवस्थापन या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन रवळा, वरखेडी खु, नायगांव, पळशी व वाडी या गावांमध्ये कृषि सहाय्यक जामठी, धनवट, बनोटी, पळाशी, कृषि पर्यवेक्षक व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचे मार्फत करण्यात आले यात प्रामुख्याने लष्करी अळीचा जीवनक्रम, नुकसान करण्याची क्षमता, उपाययोजना व विद्यापीठाच्या शिफारशी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापाळ्यांचा वापर, ५% निंबोळी अर्काची फवारणी, अंडीपुंज व अळ्या वेचून नष्ट करणे, कार्बोफ्यूरॉन ३% ३३ कि.ग्रॅम/हे किंवा फोरेट १०% सीजी १० कि.ग्रॅम/हे जमिनीत ओलावा असताना मिसळावे, थायोमिथाक्झाम १२.५% + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रिन ९.५% झेड सी १२५ मिली/हे ५०० लि पाण्यात किंवा क्लोरॅट्रीनीलीप्रोल १८.५ % १५० मिली/हे ५०० लि. पाण्यात मिसळून फवारावे अश्या प्रकारच्या शिफारशीचे अवलंब करण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत शेतकरी वर्गास शेतीशाळेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या