Advertisement

Responsive Advertisement

आमदार राजेश पवार यांच्या आढावा बैठकीत सरसकट नुकसान भरपाईच्या मागणीसह वीज वितरण कंपनीवर तक्रारींचा पाऊस...

धर्माबाद- आमदार राजेश पवार यांच्याअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात तालुका समन्वय समितीच्या आढावा बैठकीत सरसकट नुकसान भरपाईच्या मागणीसह वीज वितरण कंपनीवर तक्रारीचा अक्षरशः पाऊसच पडला!
अतिवृष्टी मुळे जे  नुकसान झाले त्या अनुषंगाने समन्वय समितीचे आढावा बैठक घेऊन चर्चा होणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पवार यांच्या आदेशावरून तालुका समन्वय समितीची उमरी व धर्माबाद तालुक्यासाठी येथील माहेश्वरी भावनात आढावा बैठक संपन्न झाली.
ही आढावा बैठक, बैठक न राहता या बैठकीचे हळूहळू जनता दरबारातच परिवर्तन होत गेले. या बैठकीत दस्तुरखुद आमदार राजेश पवार, त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद सदस्या सौ. पुनम ताई पवार, धर्माबादचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेळके, यांच्यासह उमरी व धर्माबाद तालुक्यातील तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता, महावितरणचे कर्मचारी व अभियंता, जलसंधारण विभागाचे कर्मचारी व प्रमुख, जलसंपदा विभागाचे कर्मचारी व प्रमुख, तद्वतच बहुतांशी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, व पोलीस प्रमुख यांची उपस्थिती होती.
तालुका समन्वय समितीची उपरोक्त आढावा बैठक ही फक्त कर्मचाऱ्यांच्या अंतर्गतच असायला पाहिजे होती. पण सदरील बैठकीचे वृत्त धर्माबाद तालुक्यात वाऱ्यासारखे पसरले होते. त्या अनुषंगाने झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले व त्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळण्यासाठी, तद्वतच वीज वितरण कंपनीच्या ज्या शहरी व ग्रामीण भागात न सुटणाऱ्या समस्या आहेत त्याचा उद्रेक हा सदरील बैठकीत व पर्यायाने होत गेलेल्या जनता दरबारात झाला. प्रत्येक गावातून नेतृत्व करणारे जबाबदार नागरिक प्रशासनास आपल्या विविध समस्या घेऊन धारेवर धरत होते. त्यामध्ये प्रामुख्याने माजी संचालक गोविंदराव सोनटक्के, विठ्ठल पाटील चोळाखेकर, लक्ष्मण निदानकर, गफार बेग, आदींनी आपापल्या गावचे लक्षवेधी प्रश्न मांडले.
त्या अगोदर आमदार राजेश पवार यांना विविध विभागांच्या प्रमुखांनी त्यांच्या अंतर्गत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा वाचून दाखवला व तो लेखी स्वरूपात आमदार साहेबांना सादर केला.
उपरोक्त पार्श्वभूमीवर जे अतिवृष्टीचे संकट आलेले आहे आणि सर्वसामान्य जनता त्यामध्ये भरडून निघत आहे त्या अनुषंगाने विविध विभागांच्या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे कामे करून आपापली जबाबदारी निभावत गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन आमदार राजेश पवार यांनी करीत नायगाव विधानसभा मतदारसंघात जे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे त्यांना तात्काळ सरसकट मदत मिळण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करीन असे सांगितले.
*चौकट*  सदरील बैठकीला शेवटी संबोधित करताना उपविभागीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेळके यांनी सर्व कर्मचाऱ्यांना त्यातल्या त्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आपल्या कामासंदर्भात होत असलेल्या दिरंगाईच्या पार्श्वभूमीवर गर्भगळीत ईशारा देत अक्षम्य चुका झाल्या तर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हे दाखल करून असा ईशारा दिला.
उपरोक्त आढावा बैठक ही धर्माबादचे गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम विकास अधिकारी संदीप गादेवार, डी.जी. खंडागळे यांच्या अथक परिश्रमातून सुनियोजित पणे संपन्न झाली.
*चौकट* सदरील बैठकीला आमदार राजेश पवार यांनी दुपारी तीन वाजल्याची वेळ दिली होती. पण विविध विभागाचे कर्मचारी नेहमीप्रमाणे बैठक किमान एक तासाने उशिरा चालू होईल या परंपरेला अनुसरून आजूबाजूला विखरले होते. पण आमदार राजेश पवार हे दहा मिनिटे अगोदरच आपल्या खासियतेप्रमाणे पोहोचले. व सर्व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यातल्या त्यात बऱ्याच विभागाचे बरेच कर्मचारी अनुपस्थित होते. त्यांची नोंद घेण्यात आली असून सबळ स्पष्टीकरण जर नाही दिले तर त्यांच्यावर काय कार्यवाही करावी यासंदर्भात ते प्रशासनाच्या जाणकार लोकांकडून माहिती घेत आहेत.
*चौकट*  भारत देश आता जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असून जागतिक स्तरावर एक आदर्श राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय लोकांची राष्ट्रभक्ती अतिशय प्रखर व्हावी यासाठी हर घर तिरंगा हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतले असून त्यांना भरपूर प्रतिसाद देण्यासाठी व प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करण्याचे आवाहनही आमदार राजेश पवार यांनी उपस्थितांना केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या