Advertisement

Responsive Advertisement

वैशाली सामंत यांची पहिली निर्मिती असलेलं 'सांग ना' गाणं प्रदर्शित

मुंबई -
आपल्या सर्वांची आवडती लाडकी गायिका वैशाली सामंत हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी गाऊन आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. हिंदी, मराठी तसेच इतर कुठल्याही भाषांमध्ये वैशाली सामंत सहजतेने वावरलेली आहे. आणि फक्त गायिकाच नव्हे तर संगीतकार, गीतकार असा तिचा प्रवास उंचावत गेला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे म्हणजे निर्मिती क्षेत्रात तिने पदार्पण केलं आहे. ते निमित्त म्हणजे टी सिरीज प्रस्तुत "सांग ना...!" 

‘टी सिरीज’ आणि वैशाली सामंत यांनी मिळून केलेलं हे पहिलं इंडिपेंडंट साँग आहे. आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर जे दोघंही उत्कृष्ट कलाकार आहेत आणि खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत ते या गाण्याच्या निमित्तानं पडद्यावर आपल्याला पहिल्या प्रथमच एकत्र दिसणार आहेत. 'सांग ना...' या गाण्यात छोटीशी उत्कंठावर्धक कथा आहे. कथा जरी मॅाडर्न आॅफिसमधली असली, तरी त्यातील शब्दरचना रांगड्या भाषेतील आहे. त्यामुळं हे गाणं रसिकांना वेगळाच अनुभव देणारं ठरेल. याचं कॅाम्पोझिशन आणि व्हिडीओ एकदम कॉन्ट्रास्ट आहे. 

'सांग ना...' या गाण्याबद्दल बोलताना वैशाली सामंत अश्या म्हणाल्या, फिल्मी आणि नॉन फिल्मी अश्या दोन प्रकारचं संगीत असतं, जेव्हा तुम्ही नॉन फिल्मी म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर इंडिपेंडंट गाणं करता, तेव्हा ते गाणं कसं असावं याचे फ्रीडम आपल्याला असते. आणि ते गाणं चांगलं करण्याची जबाबदारीही आपलीच असते. माझ्यासाठी गाणं म्हणजे एक दागिना आहे. त्याची जडण घडण कशी असावी, तो दागिना सुंदर दिसण्यासाठी जशी नजकात महत्वाची आहे तसेच गाण्याचे आहे. त्याचे शब्द, त्याची चाल, त्याचा ठेका आणि त्याच्यातील स्वर हे सगळे इंपॉर्टन्ट अस्पेक्ट्स आहेत. आणि मी प्रत्येकवेळी हा प्रयत्न करते कि माझ्याकडून माझ्या श्रोत्यांसाठी काहीतरी वेगळा जॉनर, वेगळा दागिना मी सादर करू शकेन. या वेळी जेव्हा ‘सांग ना..’ मी ऐकलं तेव्हा असंच वाटलं कि ह्या प्रकारचं गाणं या आधी माझ्याकडून नाही झालंय. ‘सांग ना..’मध्ये शब्द, ठेका, आणि एक छान ट्रान्स असलेली चाल आहे आणि एका मुलीचा हट्ट आहे, स्वताच्या प्रियकरासाठी ती गाताना कसे एक्सप्रेशन आहेत, हे सगळं बघून मला असं वाटलं कि हे मी गावं आणि मग ‘सांग ना’ या गाण्याची खऱ्या अर्थानं प्रोसेस सुरु झाली. अश्विनने ज्या तऱ्हेने याचे शब्द लिहिलेत त्याच्या कॉन्ट्रास्ट याचा व्हिडीओ असावा असं लगेच मनात आलं. ‘टी-सिरीज’ला हे गाणं आवडलं आणि त्यांनी मलाच या गाण्याची निर्मिती करण्यास सांगितली. आणि त्यामुळेच मी गायिका, संगीतकार थोडीशी गीतकार करता करता आज निर्माती झाले. ‘ऐका प्रॉडक्शन’ या नावच एक मुझिक प्रॉडक्शन लेबल सुरु केलं आहे. ही मुझिक कंपनी नाहीये, फक्त मुझिक प्रॉडक्शन लेबल आहे आत्तातरी. कारण गाण्याच्या क्षेत्रात बरंच काही चालू आहे, माझ्या मनातला व्हिडीओ कसा असावा याविषयी माझ्या मनात नेहमी कुतूहल असायचे, व्हिडीओ असा पाहिजे, तसा पाहिजे तर या निमित्ताने मी माझ्या मनातला व्हिडीओ तुमच्या समोर सादर करत आहे. अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी माझ्या व्हिडीओत येण्यास मान्यता दिली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पहिलीच वेळ होती माझी प्रॉडक्शनची तरीही त्या दोघांनी जे आज इंडस्ट्रीत अत्यंत नामवंत आणि रुजलेले असे कलाकार आहेत. त्यांनी माझ्या नवीन प्रॉडक्शनमधे यायला हो म्हटलं ही खूप मोठ्ठी गोष्ट आहे, मी त्यांची खूप आभारी आहे. विशेषकरून राहुल खंदारे याचं मी कौतुक करेन, माझी जी संकल्पना होती व्हिडीओची ती अब्झोरब करून अत; पासून इति;पर्यंत त्यांनी माझी साथ दिली आहे. International Institute of Sports Management (IISM)चे माझे मित्र निलेश आणि रसिका कुलकर्णी यांनी या गाण्याच्या व्हिडिओसाठी त्यांचे ऑफिस उपलब्ध करून दिले त्यामुळेच माझ्या मनातला हा व्हिडीओ आपल्यासमोर मी साकार करू शकले आहे.

'सांग ना...' हे गाणं खऱ्या अर्थानं अनोखा आनंद देणारं असल्याची भावना व्यक्त करत अभिजीत खांडकेकर म्हणाला की, सुखदा आणि मी फार कमी वेळा एकत्र आलो आहोत, पण म्युझिक अल्बमसाठी आम्हाला एकत्र आणण्याची किमया 'सांग ना...'नं केली आहे. आम्हाला एकत्र पाहण्याची आमच्या चाहत्यांची इच्छा या निमित्तानं पूर्ण झाली आहे. वैशाली सामंत यांचा मी खूप मोठा फॅन आहे. माझ्या पहिल्या चित्रपटातील गाण्याला त्यांचा आवाज होता. लोकप्रियतेचे बरेच विक्रम आपल्या नावे करणाऱ्या गायिकेनं अल्बमसाठी विचारणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. भंडारेंनी हे गाणं खूप सुंदररीत्या शब्दबद्ध केलं आहे.

'सांग ना...' हे गाणं आपल्यासाठी बऱ्याच कारणांमुळं खास असल्याचं सांगत सुखदा खांडकेकर म्हणाली की, कोणतंही पहिलं वहिलं काम स्पेशल असतं. 'सांग ना...' हा अभिसोबतचा माझा पहिला म्युझिक व्हिडीओ असल्यानं खूपच खास आहे. बऱ्याच वर्षांनी आम्ही एकत्र काम केलं आहे. वैशालीताईच्या प्रोडक्शन हाऊसमधील हे पहिलं प्रोडक्शन असल्यानंही 'सांग ना...' हे गाणं स्पेशल आहे. कलाकार जेव्हा प्रोड्युसर होतो, तेव्हा खूप चांगली कलाकृती घडवतो. कारण त्याला कलाकार आणि निर्माता अशा दोन्ही बाजू माहित असतात. 'सांग ना...' हा अल्बम उत्तम, श्रवणीय आणि नेत्रसुखद बनवण्यासाठी संपूर्ण टिमनं खूप मेहनत घेतली आहे. एका दिवसात हसत-खेळत शूटिंग पूर्ण केलं. अभी आणि मी जरी नवरा-बायको असलो तरी अगोदर खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळं आमची केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षित करेल. राहुल खंदारे व्हिडीओ शूट करताना खूप क्लीअर होते. त्यामुळं काम करणं सोपं झालं.

डिओपी पार्थ चव्हाण यांनी 'सांग ना...'ची सिनेमॅटोग्राफी केली असून, मनीषा शॅा यांनी प्रोडक्शनची जबाबदारी सांभाळली आहे. अमेय नरे यांनी अतिशय सुरेख म्युझिक अरेंजमेंट केलं असून, बासरीवादन विजू तांबे यांनी केलं आहे. शॅनेल फरेरा यांनी बॅकींग व्होकल्स गायलं आहे. मिक्सींग अँड मास्टरींग रुपक ठाकूर यांनी, तर सत्यजीत भोसले यांनी संकलन केलं आहे. कॅास्च्युम तन्मय जंगम, हेअर प्रीती गांधी आणि मेकअप अमित सावंत यांनी केला आहे. ‘अॅट स्टुडिओ’मध्ये रेकॅार्ड करण्यात आलेल्या या गाण्याचं पोस्ट प्रोडक्शन ‘एसटीटी प्रोडक्शन्स’नं केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या