Advertisement

Responsive Advertisement

अ‍ॅन्टी करप्शन विभागाचा अजब कारभार; भ्रष्टाचार करणाऱ्यांनाच दिले चौकशीचे आदेश ,खासदार इम्तियाज जलील यांची संतप्त प्रतिक्रिया


औरंगाबाद : भविष्य निर्वाह निधी कार्यालय, कामगार कार्यालय यांच्यासोबत हातमिळवणी करुन कामगारांना मिळालेल्या मजुरीतुन लेव्हीच्या नावाखाली ३० टक्के रक्कम वसुली करुन औरंगाबाद माथाडी व असंरक्षीत मंडळ संचालकांनी कोट्यावधीची लूट केली केल्याची लेखी तक्रार खासदार इम्तियाज जलील यांनी दिनांक २२/१२/२०२० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक (अ‍ॅन्टी करप्शन) विभागाकडे नोंदवली होती; तब्बल दोन वर्षानंतर म्हणजे २५/०७/२०२२ रोजी अपर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मान्यतेने अपर पोलीस अधिक्षक, (मुख्या-१) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी थेट प्रधान सचिव कामगार विभागालाच चौकशी करुन अहवाल सादर करण्याची विनंती केली. 
          औरंगाबाद माथाडी व असंरक्षीत कामगार मंडळात नोंदणीकृत माथाडी कामगारांची वर्षानुवर्षा पासुन आर्थिक पिळवणुक होत असल्याने अनेक माथाडी कामगारांनी थेट खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे सविस्तर माहितीसह निदर्शनास आणुन दिले होते. त्याअनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद माथाडी व असंरक्षीत कामगार मंडळात झालेल्या करोडो रुपयाच्या अपहाराची व तक्रारीत नमुद सर्व मुद्दयांवर सखोल चौकशी होऊन, संबंधित अध्यक्ष, कार्मिक अधिकारी व मंडळाचे सचिव यांचे विरुध्द अपहाराचा, फसवणूकीचा व भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी व गोरगरीब कामगारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती.
          परंतु सबब प्रकरणी त्यावेळी कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा कार्यवाही न करता ज्या विभागाच्या आशिर्वादाने महाघोटाळा झालेला आहे त्याच विभागाला तब्बल दोन वर्षानंतर चौकशी करण्याचे आदेश दिल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी आश्चर्य व्यक्त करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारभारावर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले.
          माथाडी कामगारांना न्याय न देता उलट कोट्यावधी रुपयाचा महाघोटाळा करणाऱ्या माथाडी मंडळ, भविष्य निर्वाह निधी विभाग व कामगार विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठिशी घालुन त्यांना अभय देणारे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर दबाव आणून प्रकरण लपविण्याचा प्रयत्न करणारे व चौकशीत अडथळा निर्माण करणारे सर्व संबंधितांविरुध्द सुध्दा सखोल चौकशी करुन कायदेशिर कार्यवाही करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या