Advertisement

Responsive Advertisement

शिंदे, फडणवीसांमुळे संभाजीनगरकरांना 'अच्छे दिन'; पाणी मिळणार, रोजगाराच्या संधीही वाढल्या : विजय औताडे


औरंगाबाद (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याच्या राजधानीचे शहर असूनही महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात येथील पाणी प्रश्न मार्गी लागू शकला नाही. उलट आधी जेवढे पाणी मिळायचे त्यातही कपात व्हायला लागली. आत दिवसाला एकदा पाणी यायला लागले. मात्र, आता एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस  सरकारने लक्ष घातल्याने येथील पाणी प्रश्न निकाली लागण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून महारोजगार मेळावा घेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ही संभाजीनगरकरांसाठी नव्या बदलाची नांदीच म्हणावी  लागेल, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी सरकार याबाबत करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करीत त्यांचे आभार मानले आहेत. 

छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न राज्यभर गाजत आहे. कित्येक दिवस शहरात आठ दिवसांतून एकदा पाणी येत होते. याबाबत खूपच ओरड सुरु झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरात सभा घेऊन पाणी योजनेबाबत मोठ-मोठ्या घोषणा केल्या. पाणीपट्टी देखील अर्ध्यावर आणण्याचे जाहीर केले. पण प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी झालीच नाही. अर्थात, तत्कालिन मुख्यमंत्र्यांना ही सभा पण भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत काढलेल्या मोर्चामुळे घ्यावी लागली होती. एवढा मोठा मोर्चा निघूनही तत्कालीन सरकारला  संभाजीनगरकरांचा आक्रोश दिसला नव्हता, हे दुर्दैवच. 

पण आता हे चित्र बदलण्याची अपेक्षा वाढली आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  संभाजीनगरात आल्यावर पाण्याच्या मुद्द्यावर आढावा घेतला. जुन्या आणि नव्या पाणी योजनेला पैसे कमी पडू न देण्याची ग्वाही दिली. ही योजना लवकर पूर्ण न होण्यास महापालिकेत सत्ता राहिलेल्या पक्षाच्या सांगण्यावरुन काम करणारे अधिकारी जबाबदार आहेत. हेच अधिकारी झारीतील शुक्राचार्य बनले आहेत. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने ही योजना प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वाटत आहे. पाणी योजना लवकर न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार असल्याचे मागच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. मात्र, तो सुका दम ठरला होता. आता मात्र, एकनाथ शिंदे यांनी संबंधित कंत्राटदाराला तंबी भरली असून, बोलले ते करेल अशी मुख्यमंत्र्यांची ख्याती आहे. त्यामुळे कंत्राटदाराला काम करावेच लागणार आहे. त्याचा  संभाजीनगरकरांना फायदाच होणार असून, शहराचा पाणी प्रश्न निकाली लागण्याबाबत आशा उंचावली आहे, असे विजय औताडे म्हणाले. 

विशेष म्हणजे पाणी योजनेसाठी लागणार पैसाच मागच्या सरकारने वेळोवेळी न दिल्याने ही योजना रखडली होती. आता नवे सरकार तातडीने हे पैसे देत असल्याने ही योजना लवकर मार्गी लागून  संभाजीनगरकरांना नियमित पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षाही विजय औताडे यांनी व्यक्त केली. 

महारोजगार मेळावा हे योग्य पाऊल 
महाविकास आघाडी सरकार असताना राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री एकच होते. त्यामुळे 
 संभाजीनगर  शहराला उद्योग आणि रोजगाराच्या दृष्टीने काही मिळेल, अशी अपेक्षा होती. पण पालकमंत्री म्हणून शहरात येणारे उद्योगमंत्री वेगळेच 'उद्योग' आणि पक्षश्रेष्ठींना खुश करण्यात गुंतलेले दिसत होते. मागील सरकारच्या काळात  संभाजीनगरातील युवकांना रोजगाराच्या संधी तर उपलब्ध झाल्या नाहीत. उलट उद्योग बंद पडले. मात्र, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येताच युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालविकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतल्याने सर्वात पहिला महारोजगार मेळावा  संभाजीनगरात पार पडत आहे. यामध्ये इंजिनीअरिंग पदवी, पॉलिटेक्निक डिप्लोमा, आयटीआय तसेच इतर विज्ञान, वाणिज्य व कला शाखा पदवीधर,  दहावी, बारावी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक  उमेदवारांसाठी  रोजगाराची साधारणपणे २२८३ आणि अँप्रेंटिसशीपसाठी ३०२९ अशी एकूण ५३१२ पदे उपलब्ध होणार असून, विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.ही मोठी गोष्ट असून, त्याचे स्वागत करावे तेवढे थोडे आहे, असे विजय औताडे म्हणाले. 

एवढेच नाही तर ऐतिहासिक महत्व असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे नाव पुन्हा देवगिरी करण्याची घोषणा मंत्री लोढा यांनी केली आहे. हे ऐतिहासिक पाऊल असून, त्यामुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवात भरच पडणार आहे, असेही विजय औताडे म्हणाले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या