Advertisement

Responsive Advertisement

मुख्यमंत्र्यांची सभा पूरनियंत्रण रेषेत, पाटबंधारे विभागाला काळझोप पूर नियंत्रणासाठी बैठकच झालेली नाही ?


पैठण - पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाथसागरातील खळाळणाऱ्या जलप्रवाहाचे तडाखे सातत्याने प्रकल्पाच्या भिंतींना बसत आहेत. २००६ मध्ये आलेल्या महाप्रलयाच्या आठवणीने झोपा उडाल्या आहेत. त्यावेळी   तब्बल ३२३ गावे ९ दिवस अक्षरशः पाण्याखाली होती. आताही तशीच परिस्थिती आहे. ११० दिवसांपासून धरणाचे दरवाजे सताड उघडे असूनही ‘पूरनियंत्रण व उपाययोजना बैठक' घेण्यात आलेली नाही. अत्यंत धक्कादायक म्हणजे पूरनियंत्रणरेषेत असलेल्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेची तयारी केली जात आहे. पूरनियंत्रण रेषेत सभेसाठी आलिशान मंडप उभारण्यात येत असतानाही पाटबंधारे विभागाने त्यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही.
‘गोदावरी’ची पाणीवहन क्षमता १ लाख क्युसेक्स...
सध्या धरणात प्रतिसेवंâद ६६ हजार क्युसेक्सने जलप्रवाह नव्याने दाखल होत आहे तर ७७ हजार क्युसेक्सने जलविसर्ग केला जात आहे. उर्वरित पाणीसाठा धरणातच थोपविला जात आहे. पाणीसाठवण क्षमतेपेक्षा जास्त जलप्रवाह नाशिक व नगर भागातून अचानक आल्यास धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागणार आहे. आजमितीस गोदावरी नदीची पाणीवहन क्षमता केवळ १ लाख क्युसेक्स एवढीच आहे. सध्या गोदावरीच्या पात्रातून ७७ हजार क्युसेक्सने जलप्रवाह जात असतानाच नदीचा पुâगवटा वाढून काठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कसा आला होता २००६ चा जलप्रलय?
या चिंताजनक पार्श्वभूमीवर २००६ च्या महाप्रलयाच्या आठवणींनी पैठणकरांच्या झोपा उडाल्या आहेत. त्यावेळी जे घडले, दुर्दैवाने नेमके तसेच आता घडत आहे. ३ ऑगस्ट २००६ पासून धरणात पाणी येण्यास प्रारंभ झाला. वरची सर्व ९ धरणे तुडुंब भरली होती. पुढे पाऊस पडणार असा अंदाज होता. असे असताना जायकवाडी धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा ठेवला गेला. ना पूर्वतयारी बैठक ना कोणतेही नियोजन, यामुळे भयानक पूरस्थिती निर्माण झाली. धरणात अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. नव्याने जलप्रवाह येऊ लागला. धांदल उडालेल्या पाटबंधारे अभियंत्यांनी ६ ऑगस्टला १८ हजार ८६४ क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात केली. परंतु, पाण्याची आवक भयावह पद्धतीने वाढताच धरणाचे आपत्कालीन सर्व २७ दरवाजे उघडून १० ऑगस्टला तब्बल २ लाख ६० हजार क्युसेक्सने जलप्रवाह सोडण्याची वेळ प्रशासनावर आली.  आक्राळविक्राळ रूप धारण करून हा जलौघ गोदापात्रात झेपावला. लाखभर क्युसेक्सची क्षमता असलेल्या गोदावरी नदीला हा भार सहन झाला नाही आणि तिने महाप्रलयाचे रूप धारण केले.
अक्षरशः हाहाकार उडाला होता
पैठण शहर पूर्णपणे पाण्याखाली गेले. तालुक्यातील १८ गावांमध्ये पाणी शिरले. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनुक्रमे ११ व २६ गावांत महापूर आला. बीड व माजलगाव तालुक्यातील एकूण ८२ गावांमध्ये महापुरामुळे हाहाकार उडाला. परभणी शहरासह पाथरी, गंगाखेड व पूर्णा या तालुक्यांतील अनुक्रमे २५, ७८ व १० गावांमध्ये महापुराने उच्छाद मांडला. अगोदरच पावसाचे पाणी शिरलेल्या नांदेड शहर व जिल्ह्यातील गावांना सर्वाधिक तडाखा बसला. उमरी, लोहा, कंधार, मुदखेड, बिलोली, धर्माबाद व नायगाव येथील जनजीवन विस्कळीत झाले.
शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक गलितगात्र!
उपरोक्त पार्श्वभूमीवर यावेळी वेगळी परिस्थिती नाही. कारण ११० दिवसांपासून धरणाचे दरवाजे उघडे आहेत. या संपूर्ण काळात महसूल, पोलीस, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण व सामाजिक संघटना यांच्या एकाही संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही. अचानक पूरस्थिती उद्भवल्यास स्थलांतर, रेशन धान्य, होड्या, जीवरक्षकांची नवीन नोंदणी, सेवाभावी संस्था, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांक आदींची कोणतीही पूर्वतयारी प्रशासनाने केलेली नाही. संतापजनक प्रकार म्हणजे २२ जूनपासून मंत्री संदिपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर आहेत. राजकीय उलाढालीत त्यांनी आतापर्यंत केवळ तीनवेळा पैठणला भेट दिली. त्यामुळे ‘संभाव्य पूरनियंत्रण बैठक' होऊच शकली नाही. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय शक्तिप्रदर्शनाच्या या पार्श्वभूमीवर पैठणकर रहिवासी मात्र महापुराच्या भीतीने गलितगात्र बनला आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या