Advertisement

Responsive Advertisement

सेवा पंधरवाड्याची यशस्वी अमंलबजावणी करावी- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
औरंगाबाद, दि.21:- शासनामार्फत देण्यात येत असलेल्या सेवा नागरिकांपर्यंत कालमर्यादेत पोहोचविण्यासाठी 'सेवा पंधरवाडा' उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवा पंधरवाड्याविषयी जनतेमध्ये जाणीव जागृती व्हावी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा याकरिता व्यापक प्रमाणात प्रसिध्दी बरोबरच लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा. त्या अनुषंगाने या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद विभागातील  जिल्हाधिकाऱ्यांना आज येथे दुरदृश्यप्रणलीद्वारे आयोजित आढावा बैठकीत दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात सेवा पंधरवडा, एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या परंतु नियुक्ती पासून वंचित राहिलेले उमेदवारांची माहिती सादर करणे आदी विविध विषयांची आढावा बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया ,उपायुक्त् (सा.प्र.) जगदिश मिनियार, उपायुक्त (महसूल) पराग सोमण, उपायुक्त (आस्थापना) पारस बोथरा, महापालिका उपायुक्त् बी.बी.नेमाणे यांच्यासह दुरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व प्रादेशिक विभागांचे प्राधिकृत अधिकारी उपस्थित होते.

सेवा पंधरवाड्यासंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सर्व प्रादेशिक विभाग प्रमुखांना यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशित करुन श्री.केंद्रेकर म्हणाले की, सेवा पंधरवाड्यासंदर्भात जनजागृतीसाठी जिल्हा, तालुका, गावपातळीवर फ्लेक्स लावणे, व्यापक प्रसिध्दी करुन लोकप्रतिनिधींचा सहभागाने जनजागृती करावी, जेणेकरुन सामान्य जनतेला या उपक्रमाचा लाभ होईल. तसेच 28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा, 15 ऑक्टोंबर रोजी माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करणे, मराठवाडा विभागातील स्वातंत्रसैनिकांच्या शपथपत्रांची पडताळणी, एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या परंतु नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांची माहिती सादर करण्याबाबतचा आढावा, ग्रामसभेचे आयोजन , लम्पी आजारावरील लसीकरण,  याबरोबरच शासनाच्या महत्वाकांक्षी योजनाची अंमलबजावणी आदी  विषयांचा आढावा यावेळी विभागीय आयुक्तांनी घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या